Pages Menu
TwitterRssFacebook
Categories Menu

इस्लाम सर्वांसाठी

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

इस्लाम सर्वांसाठी

(सफलता आणि मुक्तीचा एकमेव मार्ग)

 आम्हांपैकी असा कोण आहे जो या जीवनामध्ये सफल होऊ इच्छित नाही? दिवस-रात्र आम्ही हाच प्रयत्न करत असतो, की आमचे व आमच्या कुटुंबियांचे जीवन सफल व्हावे. याकरिता आम्ही आमच्या जीवनाची काही उदि्दष्ट्ये ठरवतो व त्यांच्या प्राप्तीकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जेव्हा हे उदि्दष्ट प्राप्त होते तेव्हा आमच्या आनंदाची सीमा राहात नाही. या उदि्दष्टप्राप्तीमुळे आम्ही आनंदविभोर होतो. परंतु एखाद्या वेळी जर काही कारणांमुळे आम्ही उदि्दष्ट प्राप्त करू शकलो नाही तर या असफलतेमुळे आम्ही खूप दु:खी होतो आणि कधी कधी तर ईश्वरालाच याचा दोषी मानतो.

विचार करण्याची गोष्ट

थोडा विचार केल्यानंतर हे सत्य आपसूकच कळते की आम्ही सफलतेकरिता जे मापदंड निश्चित केले आहेत; त्यांचा संबंध आमच्या जीवनातील एका सीमित क्षेत्राकरिताच मर्यादित आहे. खरे तर, आमचे हे जीवन मृत्युबरोबर संपत नसून त्यानंतरही एक जीवन आहे. काही अपवाद वगळता जगातील बहुतांशी लोक मरणोत्तर (पारलौकिक) जीवनाविषयी गाढ विश्वास बाळगतात. आमची सर्व धडपड या ऐहिक जीवनाला सफल बनविण्यापुरती व भौतिक सुखसुविधा प्राप्त करण्यापर्यंतच सीमित आहे. मृत्युपश्चात नक्की काय होणार आहे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आमचे लक्ष क्वचितच जाते. खरे तर ऐहिक व पारलौकिक हे दोन्ही जीवन संपूर्णपणे सफल बनविण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रत्येकाचे यशापयशाचे मापदंडदेखील भिन्नविभिन्न आहेत. एखादा संपत्तीला महत्त्व देतो तर एखादा सत्तेला! एकजण व्यापारी बनू इच्छितो तर दुसरा अधिकारी! एखाद्यासाठी सुखी कुटुंब हेच सफलतेचे प्रतीक असते तर दुसऱ्या एखाद्याला शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व जास्त असते. बहुसंख्य लोक एका ध्येयाची पूर्ती झाल्यानंतर दुसरे ध्येय निश्चित करतात. मात्र यावेळी जर असफलता प्राप्त झाली तर पूर्ण जीवनच असफल झाले असा त्यांचा भ्रम होतो. खरे पाहता अगोदरची ध्येय व उदि्दष्ट्ये प्राप्त करण्यामध्ये त्यांना सफलता भेटली होती, हे मात्र ते विसरतात.

धर्माची भूमिका

मानव या जगामध्ये असाच आलेला नाही; तर त्याला एक ईश्वराने निर्माण केले आहे. यामुळेच मानवी जीवनाचा उद्देश तसेच जीवनसफलतेच्या मापदंडांना उत्तमप्रकारे त्या ईश्वराव्यतिरिक्त अन्य कोण बरे जाणणार? धर्म याच सत्याचे ज्ञान मानवापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहे. उपासनाविधीच्या ज्ञानासहित मानवाचे पूर्ण मार्गदर्शन करणे तसेच ऐहिक जीवनातील प्रत्येक क्षेत्राकरिता मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे धर्माचे आद्य कर्तव्य आहे. हे उदि्दष्ट जर पार पडत नसेल तर तो अपूर्ण धर्म असतो. सर्व धर्मांनी आणि विचारप्रणालींनी हे दायित्व अदा करताना मानवासमोर सफलता व मुक्तीचा उद्देश ठेवला आहे. मानवी इतिहास साक्षी आहे की वेगवेगळया रूपांनी मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता मापदंड म्हणून सफलता  व मुक्ती यांनाच प्रस्तुत केले गेले आहे. पण याचबरोबर इतिहास ही वास्तविकतादेखील नमूद करतो की सफलता आणि मुक्ती या संकल्पनांविषयीच्या विचारधारांमध्ये तसेच  धर्माधर्मांमध्ये मतभेद व विरोधाभासदेखील आढळतात.

हिंदू धर्माची विचारधारा

इथे पारलौकिक जीवन आणि पुनर्जन्माची संकल्पना अशा दोन पूर्णपणे भिन्न धारणा आढळतात. वेदांमध्ये स्वर्ग व नरकाचे वर्णन आढळते, ज्यायोगे पारलौकिक जीवनात पुनर्जन्म घेण्याची पुष्टी होते. याचवेळी इतर ग्रंथांमध्ये मात्र आवागमनीय पुनर्जन्माचे वर्णनदेखील आढळते. यानुसार आत्मा विभिन्न योनींमध्ये अनेकवेळा जन्म (आवागमनीय पुनर्जन्म) घेऊन उन्नत होत होत ईशआत्म्यामध्ये विलीन होतो. यालाच मुक्ती संबोधले आहे.

या दोन्ही धारणांव्यतिरिक्त श्रीमद्भगवतगीतेमध्ये मुक्तीप्राप्तीचा एक मार्ग संन्यास घेऊन सत्यज्ञानाच्या प्राप्तीकरिता स्वत:चे संपूर्ण समर्पण करणे असा सांगितला आहे. तसेच एकेठिकाणी या जगातील जीवन-कर्तव्यांची पूर्ती करताना सर्व ऐहिक इच्छांना स्वत:हून त्यागणेसुद्धा मुक्ती आहे असे प्रतिपादन केले गेले आहे.

वेदांमध्ये पुनर्जन्माची (आवागमन) संकल्पना आढळत नाही. यांचे अध्ययन करताना स्पष्ट होते, की प्रत्यक्षात दोनच लोक (जीवन) आहेत – वर्तमान (ऐहिक) लोक आणि परलोक (पारलौकिक जीवन)! वेदांच्या अध्ययनामुळे हेदेखील स्पष्ट होते, की परलोकामध्ये उच्च स्थान प्राप्त करणे हीच मुक्ती होय! तिथे पूर्ण कामनापूर्तीबरोबरच विविध प्रकारांचे आनंद व सुख असेल. आणि तिथे ईश्वराचे शासन असेल. स्वर्गाचे आकर्षक व अतिसुंदर वर्णन वेदांमध्ये सापडते. तसेच नरकाचे अतिकष्टदायक असे वर्णनदेखील आढळते. वेदांनुसार परलोकातील सफलता हीच खरी सफलता तसेच मुक्ती आहे.

ऋग्वेदामध्ये (9/113/11) प्रार्थना शिकवली गेली आहे की, “आनंद व स्नेह वर्तमान लोकामध्ये आहेत, (पण) जिथे सर्व कामना, इच्छा मनात येताक्षणीच पूर्ण होतात, त्याच अमरलोकामध्ये मला स्थान द्यावे.”

श्रीमदभागवत महापुराणच्या पंचमस्कन्ध नुसार,

“अठ्ठावीस प्रकारचे नरक आहेत. आत्म्याचे हनन करणारे, दुराचारी, पापी, असत्यगामी लोकांना नरकप्राप्ती होते.”                                   (ऋग्वेद : 4/5/5 व यजुर्वेद : 40/3)

बौद्ध धर्म विचारधारा (धम्म)

मानवाने स्वत:च्या इच्छा-आकांक्षांचे दमन करावे अथवा त्यांपासून संपूर्ण मुक्त व्हावे हेच निर्वाण अथवा मुक्ती होय. महात्मा बुद्धांच्या मते स्वर्ग अथवा नरकाचे लौकिक अस्तित्व नाही. तसेच मनुष्य याच जीवनामध्ये स्वत:च्या चांगल्या अथवा वाईट कर्मांनी स्वर्ग अथवा नरक प्राप्त करू शकतो. गौतम बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारलेदेखील नाही, तसेच स्वीकारलेदेखील नाही! त्यांच्या शिकवणीनुसार मानवाच्या मुक्तीसाठी कोणाही ईश्वराच्या अथवा देवीदेवतांच्या कृपेची व अनुग्रहाची मुळीच आवश्यकता नाही. आत्म्याच्या अस्तित्वाचादेखील बुद्धांनी इन्कार केला. या धारणेनुसार मुक्ती तथा निर्वाणाचा संबंध मानवी भौतिक जीवनापुरताच सीमित आहे. पारलौकिक जीवनाविषयी इथे कुठलेही मार्गदर्शन सापडत नाही. वास्तविक धार्मिक नैतिकता जर ईश्वराला नाकारण्यावरच आधारलेली असेल तर तिचे पालन जास्त काळापर्यंत अशक्य असते. बौद्ध विचारधारेबरोबर नेमके हेच घडले आहे.

जैन धर्माची विचारधारा

जैन मतानुसार आत्मा मानवी शरीरामध्ये बंदी आहे आणि या भौतिक शरीरापासून त्याची मुक्ती होणे हीच खरी मुक्ती होय! आणि यासाठी शरीराला इतके काहीह कष्ट देणे आवश्यक आहे की आत्मा शरीरातून निघून जावा. कठोर तपस्येनेदेखील हे साध्य होऊ शकते. या धारणेनुसार भुकेने व्याकुळ होऊन आलेला मृत्यु श्रेष्ठ व प्रशंसनीय आहे. जैन मत ईश्वराला सृष्टीचा निर्माता म्हणून स्वीकारण्यास नकार देतो, पण एका मुक्त आत्म्याला मात्र समस्त ईशगुणांनी संपन्न मानतो. यानुसार प्रत्येक सजीव ही स्थिती अथवा अवस्था प्राप्त करू शकतो (म्हणजे ईशगुणांनी संपन्न होऊ शकतो) आणि करतही आहे. म्हणजेच अशा रीतीने येथे अगणित ईश्वरांचा स्वीकारदेखील आढळतो. तसेच प्रत्येक आत्मा कर्माशी जोडलेला असून यापासून सुटका होणे म्हणजेच आत्म्याला मुक्ती मिळणे असा विश्वास येथे आढळतो.

शीख धर्माची विचारधारा

शीख धर्मानुसार ईश्वरामध्ये विलीन होणे हीच मुक्ती होय. मात्र याकरिता ऐहिक सुखसोयींना त्यागण्याची वा उपवास करण्याची आवश्यकता नाही; तपश्चर्या करण्याचीदेखील गरज नाही. फक्त ईश्वराप्रती आस्था बाळगून त्याचे चिंतन-मनन करून सत्यपूर्ण जीवन व्यतीत करणे गरजेचे आहे. शीख धर्म एकेश्वरत्वाचा समर्थक आहे.

“जे लोक ईश्वराचे चिंतन मनन करतात, त्यांना मुक्ती प्राप्त होते आणि अशा लोकांना जीवन-मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळते.”                                              (गुरूग्रंथसाहिब : 11)

 ख्रिचाश्न धर्माची विचारधारा

हा धर्मसुद्धा एकेश्वरत्वाचा समर्थक आहे. पण याची परिभाषा स्पष्ट केलेली नाही. आदरणीय इसा मसीह (येशू िख्र्तास्) यांना एकाचवेळी ईश्वर तसेच ईश्वरपुत्रदेखील मानले गेले आहे. तसेच पवित्र आत्मादेखील मानले जाते. िख्र्चाश्न धर्मानुसार पापापासून संपूर्ण मुक्ती हीच खरी मुक्ती आहे. पाप हे मानवाच्या जन्मापासूनच त्याच्याशी निगडीत आहे. या पापांपासून मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे येशू िख्र्तासवर पूर्ण विश्वास ठेवणे व आस्था बाळगणे होय. या धारणेनुसार दोन हजार वर्षांपूर्वी ईश्वरपुत्र येशू िख्र्तास् यांनी सुळावर चढून व स्वत:चे बलिदान देऊन समस्त मानवजातीच्या पापांचे परिमार्जन (प्रायश्चित्त) केले आहे. म्हणूनच पाप आणि भौतिक जीवनापासून मुक्तीचा एकमेव मार्ग येशू िख्र्तासविषयी आस्था व विश्वास बाळगणे हाच आहे. िख्र्चाश्न ग्रंथामध्ये येशू िख्र्तास् (इसा मसीह) यांच्या आगमनापूर्वीच्या मानवांच्या मुक्तीविषयी स्पष्टीकरण मात्र आढळत नाही. त्याचप्रमाणे येशू िख्र्तासविषयी आस्था बाळगूनदेखील एखादा जर पापकर्मच करीत राहिला तर त्यालादेखील मुक्ती मिळणार काय? याचे स्पष्टीकरणसुद्धा  सापडत नाही.

यहुदी धर्माची विचारधारा

येथे हा ठाम विश्वास आढळतो की, विश्वातील सर्वश्रेष्ठ व स्वत: ईश्वराने निवडलेला सर्वोच्च व एकमेव वंश यहुदी वंश आहे. त्याचप्रमाणे त्यांचा व ईश्वराचा विशेष संबंध आहे. यहुदी म्हणून जन्माला आलेल्याची सफलता व मुक्ती  त्याच्या जन्माबरोबरच निश्चित झालेले आहे. तसेच ही मान्यता आहे की नरक यहुदींव्यतिरिक्त इतरांसाठी आहे आणि एकाही यहुदीला कदापि नरकात टाकले जाणार नाही, हे मत साधारणत: साडेतीन हजार वर्षांपासून प्रचलित आहे. इथेदेखील हाच प्रश्न उद्भवतो, की एखाद्या विशिष्ट वंशामध्ये जन्म घेतल्यानेच जर मुक्ती मिळत असेल तर इतर वंशांमध्ये जन्मणाऱ्यांचे भवितव्य काय? याचे स्पष्टीकरण मात्र येथे सापडत नाही.

इस्लामची मौलिकता

इस्लामनुसार मुक्तीची धारणा सहज, सुलभ,सरल, स्पष्ट व विवेकपूर्ण अशीच आहे म्हणूनच येथे सफलता आणि मुक्तीकरिता भौतिक जगाचा त्याग करून संन्यास घ्यावा लागत नाही की ऐहिक सुखसोयींचा व सुविधांचा त्याग करावा लागत नाही. तसेच स्वत:च्या शरीराला क्लेष अथवा पीडा देणेदेखील नामंजूर आहे. इंद्रियदमनाऐवजी इंद्रियनियंत्रणावर जोर दिला गेला आहे.

इस्लामनुसार सर्व मानव जन्मत:च समान आहेत. तसेच स्वर्ग एखाद्या विशिष्ट वंशाकरिता आरक्षित नाही. उच्चनीचतेच्या कल्पनेवर आधारित विभाजन इस्लाम अमान्य करतो. एखाद्या वर्णाकरिता अथवा वंशाकरिता स्वर्ग व इतरांना नरक ही संकल्पनाच इस्लाम नाकारतो. इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे म्हणूनच येथे मानवाच्या सर्व ऐहिक व पारलौकिक समस्यांची उकल व मुक्तीचा मार्ग सापडतो. भौतिक व पारलौकिक जीवनात साफल्यप्राप्तीकरिता संपूर्ण मार्गदर्शन इस्लामच्या रूपाने सापडते आणि याचे जिवंत उदाहरण पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आहे. ऐहिक व पारलौकिक दोन्ही जीवनांतील सफलता पैगंबरांनी प्रत्यक्षात आणून दाखविली आहे.

इस्लाम आवागमनीय पुनर्जन्माला पूर्णपणे नाकारतो. तसेच याला अस्वाभाविक व अविश्वसनीय मानतो. इस्लामची मूलभूत धारणा आहे, की सफलता व मुक्ती प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य आहे; मग तो कुठल्याही देशामध्ये, वंशामध्ये अथवा कालखंडामध्ये जन्मला असो! फक्त ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हीच एकमेव अट याविषयी आढळते. सफलता व मुक्तीच्या धारणेला व संकल्पनेला खालील मुद्द्यांच्या मदतीने जाणून घेणे सहज शक्य आहे.

(1) आमचे हे जीवन मृत्युमुळे समाप्त होत नाही तर वास्तविक व शाश्वत जीवन तर मृत्युपश्चातच सुरू होते.

(2) या सृष्टीचा रचनाकार व निर्माता एकच ईश्वर आहे व तोच या सृष्टीचक्राला सुचारुपणे चालवत आहे. या विश्वावर त्याचेच प्रभुत्व आहे. म्हणून आदर, सन्मान, उपासना, आराधना व पूजा त्या एकमेव ईश्वराव्यतिरिक्त इतर कोणाचीही केली जाऊ नये. तो निर्माता असल्यामुळे मानव व समाजाकरिता उत्तम काय आहे व हानिकारक काय आहे हे तोच जाणतो. त्याच्याव्यतिरिक्त हे ज्ञान कोणालाही नाही, स्वत: मनुष्यालादेखील या गोष्टी ज्ञात नाहीत.

(3) हे विश्व सुचारुपणे तसेच सुसमन्वयाने चालावे याकरिता ईश्वराने एक परिपूर्ण आणि सविस्तर जीवनप्रणाली अवतरित केली. मानवाने स्वयंस्फूर्तीने व कुठल्याही दबावाला न बाधता या प्रणालीनुसार नवसमाजनिर्मिती करावी, तसेच वैयिक्तक जीवनदेखील यानुसारच व्यतीत करावे, हीच ईश्वरेच्छा आहे. मानवतेच्या प्रारंभापासूनच तो ईश्वर विविध ईशदूतांकरवी विभिन्न भाषांमध्ये व राष्ट्रांमध्ये नेहमीच याच जीवनप्रणालीशी मानवाला अवगत करत आला आहे.

(4) कयामत (महाप्रलय) नंतर तो ईश्वर समस्त मानवजातीला पुन्हा एकदा जिवंत करेल व प्रत्येकाला जीवनाचा हिशेब विचारला जाईल की, जीवन ईश्वराच्या आज्ञापालनामध्ये व्यतीत केले की अवज्ञेमध्ये केले? मानवी जीवन एकाच व एकमेव ईश्वराच्या उपासना व आराधनेमध्ये व्यतीत झाले की अन्य कुणाच्या पूजेमध्ये व्यतीत झाले? याचप्रमाणे एकमेव निर्माणकर्त्या ईश्वरापुढे नतमस्तक झाला की त्याच्या निर्मितीपुढे झुकला याचेदेखील उत्तर द्यावे लागेल.

(5) त्या दिवशी सफल होणाऱ्यांना ईश्वर मुक्ती व स्वर्ग प्रदान करेल तर असफल होणाऱ्यांना नरकात टाकले जाईल. मृत्युपश्चातचे पारलौकिक जीवन शाश्वत व अनंत असल्यामुळे सफलता व असफलतेचे फळदेखील शाश्वत व सदासर्वदा असणारे असेल.

(6) त्या दिवशी मानवाला आकलन होईल की, खरी सफलता तर पारलौकिक जीवनातील सफलताच आहे आणि ईश्वर, ईशदूत व अवतरित झालेल्या ग्रंथांची सत्यता स्वीकार करून व अंगीकारूनच ही सफलता प्राप्त होऊ शकते.

ईश्वरातर्फे पूर्वी अवतरित झालेल्या ग्रंथांचे अवशेष आजदेखील उपलब्ध आहेत. परंतु यातील एकही ग्रंथ आज मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. या सत्याचा इन्कार केला जाऊच शकत नाही, की स्वत:च्या इच्छेनुसार या ग्रंथांमध्ये मानवाने अतोनात फेरबदल केले आणि यामुळे त्यांची मूळ शिकवणच लुप्त झाली.

आता पवित्र कुरआन हाच एकमेव अंतिम व सुरक्षित ईशग्रंथ आहे; जो मूळ स्वरूपामध्ये ईश्वराच्या वास्तविक व पायाभूत शिकवणी मानवसमाजासमोर प्रस्तुत करत आहे. आज 1450 वर्षांच्या कालावधीनंतरही मूळ स्वरूपात पूर्णपणे सुरक्षित असणे हे त्याच्या सत्यतेचे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे.

या संपूर्ण चर्चेनंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की मानवतेच्या सफलता व मुक्तीकरिता इस्लाम हाच एकमेव मार्ग आहे. याच्याव्यतिरिक्त इतर विचारधारा मानवनिर्मित अथवा मानवी हस्तक्षेप झालेल्या आहेत आणि त्यांचा ईशमार्गदर्शनाबरोबरचा संबंध संपला आहे. ईश्वराला निव्वळ पूजेपुरते सीमित करून आपल्या पूर्ण जीवनाला ईशमार्गदर्शनापासून अलिप्त व वंचित ठेवणे ही मानवाची घोडचूक आहे. या कारणामुळेच आज सर्वच व्यवस्था अस्ताव्यस्त झालेल्या दिसून येत आहेत आणि यामुळेच मानव सफलतेच्या व मुक्तीच्या मार्गापासून दूर भरकटला आहे.

प्रिय बंधु आणि भगिनींनो! आपणांस नम्र आवाहन, की स्वच्छ व खुल्या मनाने आपण इस्लामचे अध्ययन करावे. अध्ययन करतानाच आपणास हे उमगेल की ही आमच्या आत्म्याची साद आहे आणि या जीवनातील समस्त समस्यांचे समाधान इस्लाममध्येच आहे. तसेच हा विश्वास निर्माण होईल, की सफलता व मुक्तीचा मार्ग इस्लाम व्यतिरिक्त इतर कुठलाही नाही.

जो कोणी सफलता व मुक्तीचा मार्ग प्राप्त करु इच्छितो त्यास सत्यशोध आणखी पुढे कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.

इस्लाम अध्ययनासाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क करावा:

1800 2000 787